छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्घृण खूनासंदर्भात इंद्रजित सावंत जे सांगत आहेत, ती कदाचित सत्याची एक बाजू असू शकते. म्हणजे अगदीच तर्कशुद्ध पद्धतीनं सांगायचं तर जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या समोर उभं करण्यात आलं, तेव्हा औरंगजेबानं संभाजी महाराजांना मुस्लिम होण्याची ऑफर दिली होती का? याचं उत्तर समकालीन पुराव्यावर विसंबून द्यायचं झालं तर नकारार्थी द्यावं लागतं. म्हणजे तसा समकालीन कागदोपत्री उल्लेख आढळत नाही. ही गोष्ट खरी आहे. “तू होतोस का?” “तू देतोस का?” हा सर्व उत्तरकालीन कल्पनाविलास आहे. नेमकं असंच घडलं असल्याचा काकणभर पुरावा कुठंही नाही. म्हणून इंद्रजित सावंत समकालीन कागदोपत्री पुरावा समोर ठेवून बोलत आहेत. इंद्रजित सावंतांना नेमकं तेवढं आणि तेवढंच दिसत असेल,तर मात्र काही खरं नाही.
इतिहासात काही काही जागा कायमच्या रिक्त आहेत. तिथं असे काही बिंदू आहेत, ज्यांच्या पुढं मागं बरंच लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. पण मोक्याच्या ठिकाणी इतिहास मौन पाळतो. असा इतिहास कुणावरही अन्याय न करता साकल्यानं भरुन काढता येतो. तुम्ही एखाद्या मध्ययुगीन किल्ल्यावर गेलात तर मध्येच अशा अंधारवाटा लागतात. विवेकाची किनार धरून अशा अंधाऱ्या वाटा पार करता येतात. ते कठीण काम नाही. एखाद्या विशिष्ट प्रसंगी इतिहास बोलत नसेल तर त्याला वेगळ्या पद्धतीनं बोलतं करता येतं. एकाच प्रकारचे अनेक प्रसंग अशा ऐतिहासिक व्यक्तीरेखेच्या आयुष्यात अनेकदा येतातच. म्हणजे असं बघा, की औरंगजेबाच्या आयुष्याचा पट थोडा थोडका नाही. तो शिवाजी महाराजांपेक्षा बारा वर्षांनी मोठा आहे. शिवाजी महाराजांनंतर तो सत्तावीस वर्षे जीवंत होता. ढोबळ मानानं सांगायचं झाल्यास तो महाराजांपेक्षा दुप्पट आयुष्य जगला. महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यापूर्वी एक वर्ष अगोदर म्हणजेच सन १६५८ सालात तो सत्तेवर आला. मुळात तो सत्तेवर आला तेव्हाच ४० वर्षांचा होता. त्याचं निधन झालं तेव्हा तो ९० वर्षांचा होता. एवढ्या मोठ्या आयुष्यात एकाच प्रकारच्या असंख्य घटना घडण्याचा संभव जास्त असतो. अशा घटना एका नंतर एक वारंवार घडत असतात. त्यातील एखाद्या घटनेबद्दल इतिहास मौन असेल, गांगरून जाण्याची आवश्यकता नाही. तर त्यापूर्वीच्या आणि त्यानंतरच्या प्रसंगात औरंगजेब कसा वागला, यावरून पुराव्यांचा अंदाज घ्यावा लागतो. त्यावरून इतिहासातील रिकाम्या जागा भराव्या लागतात.
सत्यापर्यंत जाण्याचा तोच चांगला मार्ग आहे.
छत्रपती संभाजी महाराजांना कैद करुन ठार करण्यापूर्वी औरंगजेबाचं कॅरेक्टर समजून घेऊ या. त्याला हवा असलेला शत्रू कैद केल्यानंतर तो नेमका कसा कसा वागत आला हे बघायला नको का? औरंगजेबानं संभाजी महाराजांना मुस्लिम होण्याची ऑफर दिली असल्याचे पुरावे नसतील कदाचित. पण अशी ऑफर दिलीच नसेल कशावरून? कैदेतील चाळीस दिवसांचा वृतांत जसाच्या तसा उपलब्ध नाही. तुकड्यांत उपलब्ध आहे. नेतोजी पालकर हाही औरंगजेबाला हवा असलेला शत्रू कैद केल्यानंतर त्याला मुस्लिम होण्याची ऑफर दिलीच होती. अत्यंतिक छळ करुन नेतोजी मुस्लिम झाल्यावर पुन्हा त्यांना बादशाही आहेर देऊन गौरविण्यात आलं होतं. जहागीर म्हणून ५२ गावं दिली होती. अगदी क्रूर, अमानवीय गुन्हे केलेल्या लोकांना सुद्धा, मुस्लिम झाल्यावर तो शिक्षा करण्याऐवजी मोठमोठ्या हुद्द्यावर नेमणूक करीत असे. हीच त्याची न्याय बुद्धी होती. आपल्या गटात, म्हणजेच आपल्या धर्मात सामील झाल्यावर गुन्हेगारांना माफी देऊन हुद्द्यावर नेमण्याची परंपरा आजची नाही. ती पार औरंगजेबाने सुरू केली होती. त्यामुळं एक झालं. संपूर्ण सल्तनीत जेवढे म्हणून अस्सल गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक होते, ज्यांनी ज्यांनी लोकांना छळून मोठी माया जमवली होती, ते कसलीही भीडभाड न धरता बेधडक मुसलमान झाले. तुम्ही शासक म्हणून कसेही जगलात, कितीही क्रूर वागलात, कितीही भ्रष्टाचार केलात तरी औरंगजेबाला त्या गैरकृत्यांशी काहीही देणंघेणं नव्हतं. फक्त तो माझ्या गटात, म्हणजेच माझ्या धर्मात आला पाहिजे एवढीच त्याची अट असायची हे पुराव्यानं सिद्ध झालेली गोष्ट आहे. अत्यंतिक छळ करुनही, अनेक दिवस कैदेत ठेवूनही जे औरंगजेबाला मिळत नसत, जे मुसलमान होत नसत, अशानाच औरंगजेब शेवटी क्रूरपणे ठार करत असे. भलेही तो त्याचा भाऊ का असेना. म्हणून, “होतोस का?” “देतोस का?” याला काहीही समकालीन कागदोपत्री पुरावा नसला तरीही, औरंगजेबाचं तेच खरं कॅरेक्टर आहे, हे इंद्रजित सावंतांना कुणीतरी सांगायला हवं.
तुर्तास इतकंच..!
- संजय देशमुख, कामनगावकर