छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध पैलुंवर प्रकाश टाकणारा, विशेषतः औरंगजेब आणि संभाजी महाराजांचा वध अधोरेखीत करणारा ‘छावा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या पार्श्वभूमीवर विविध लेखकांनी छ. संभाजी महाराजांवरील साहित्य किती सुमार रेखाटलं हे संदर्भासह दाखवणारं अभ्यासक संजय देशमुख कामनगावकर यांचं विश्लेषण…..
ऐतिहासिक कथानायकाचं अनैतिहासिक चित्रण!
……………………………………………………………..
रणजित देसाईंनी पहिल्यांदा यशस्वी ऐतिहासिक कादंबरी लिहिली असं बोललं जातं. रणजित देसाई मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाडचे. कोवाड हे गाव कर्नाटकाच्या सीमारेषेवर आहे. खरं तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्हे क्रांतीसिंह नाना पाटलांच्या प्रती सरकारमुळे गाजले. त्याचवेळी कोल्हापूर हे सामाजिक स्वातंत्र्यासाठी अग्रेसर राहिलं. कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ रुजली. मराठी सिनेमाचं एकेकाळी माहेरघर म्हणून कोल्हापूर ज्ञात होतं.
चित्रपट निर्मिती क्षेत्रात भालजी पेंढारकर यांचा इथं दबदबा होता. भालजीनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात अनेक राष्ट्रभक्तीपर सिनेमे बनवले. त्यात शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या जीवनावर अनेक चित्रपट होते.
भालजींनी त्यांच्या चित्रपटातून संभाजी महाराजांचं केलेलं चित्रण तत्कालीन उपलब्ध साहित्यावर आधारित असलेलं होतं. त्यामुळं ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘थोरातांची कमळा,’ असे वास्तवात होऊन गेलेल्या कथानायकावर आधारित असलेले, पण अनैतिहासिक कथानक असलेले चित्रपट काढले. मी काय म्हणतोय ते लक्ष देऊन वाचा. कथानायक ऐतिहासिक, पण कथासार मात्र अनैतिहासिक! असं करताना आपल्या चित्रपटांतून आपण संभाजी महाराजांचं नकळत चारित्र्यहनन करत आहोत याची जाणीव भालजींना नसावीच. त्याचं कारणही तसंच आहे.
भालजी पेंढारकरांच्या अगोदर दोनशे वर्षांत मराठ्यांच्या इतिहासाचं म्हणावं तसं संशोधन झालंच नव्हतं. तोपर्यंत, केवळ बखरी म्हणजे इतिहास असा मामला होता. त्यामुळे एका बाजूला ‘शिवाजी म्हणजे चार संवगडी घेऊन काही किल्ले ताब्यात घेऊन लुटमार करणारा पुंड आहे,’ असं मानणारे लोक होते. दुसऱ्या बाजूला ‘शिवाजी म्हणजे दैवी शक्ती लाभलेला अवतारी पुरुष,’ अशी भावना असणारे लोक होते. बखरकारांनी जे प्रेम शिवाजी महाराजांच्या पारड्यात टाकलं तेवढाच त्यांनी संभाजी महाराजांचा द्वेष केला. त्याला केवळ बखरकारांचा संभाजी राजांबद्दलचा वैयक्तिक आकस कारणीभूत होता. सभासदानं पहिल्यांदा शंभू राजांवर अन्याय केला. सभासदानं आपल्या बखरीत, निधनसमयी शिवाजी महाराजांच्या तोंडी शंभू राजांविरोधात जातील अशी वाक्ये कोंबली. त्यामुळे अनेक वर्षे ते जणू महाराजांचेच शब्द आहेत असं भोळ्या मराठी माणसाची समजूत झाली. सभासदानं शंभू राजांना कोपिष्ट, अविचारी ठरवलं असलं, तरी व्यसनी आणि स्त्रीलंपट ठरवलं नव्हतं..! सभासदानं लिहिलेलं खपलं, म्हणून शंभू द्वैष्ट्यांचं अधिक फावलं. त्यांची भीड चेपली. पुढं जाऊन मल्हार रामराव चिटणीस यानं जेव्हा बखर लिहायला घेतली तेव्हा संभाजी महाराजांना होऊन सव्वाशे वर्षे उलटलेली होती. आपल्या खापर पणजोबाचा (बाळाजी आवजी चिटणीस) शंभू राजांकडून अनवधानाने वध झाला होता, या गोष्टीचं शल्य मल्हार रामराव चिटणीस याला फार होतं. आणि म्हणूनच, त्या रागातून तो शंभू राजांना अनैतिक, व्यसनी आणि स्त्रीलंपट सुद्धा ठरवून मोकळा झाला.
शंभू राजांनी त्यांच्या विरोधात कट रचणाऱ्या मंत्र्यांना दिलेली देहांताची शिक्षा आमच्या मराठी सारस्वतांनी फारच वेदना देऊन गेली असं वाटतं. म्हणून त्यांनी साहित्यातून जमेल तशी,जमेल तेवढी चिखलफेक शंभूचरित्रावर सुरू केली. या खेळात जसे जाणते लेखकराव होते तसेच अजाणते लेखकु पण होते.
बघा, संभाजी महाराजांवर आमच्या मराठी लेखकांनी किमान पन्नास तरी नाटकं लिहिली. ही सर्व नाटकं केवळ कपोलकल्पित कथानकावर होती. कथानक खोटं असलं तरी कथानायक मात्र ऐतिहासिक, खराच होता. हे सर्व लिखाण एकांगी, निंदानालस्ती करणारं, वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं होतं. पण याची लाज ना नाटक लिहिणाऱ्यांना होती, ना नाटकांचा आस्वाद घेणाऱ्या व स्वतःला अभिरुचीसंपन्न म्हणवून घेणाऱ्या मराठी रसिकांना! ‘
औरंगजेबानं संभाजीराजांचं केवळ शरीर ठार केलं. पण आमच्या मराठी लेखकांनी दोनशे वर्षे संभाजी महाराजांसारख्या एका चारित्र्यसंपन्न, महान पराक्रमी, प्रजाहीतदक्ष, ज्ञानी, सुसंस्कृत चारित्र्याचा खून केला. एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारावं या न्यायानं आमचे साहित्यिक बेलगाम होऊन वागले. संभाजी महाराजांवर आजतागायत लिहिल्या गेलेल्या नाटकांची नावं व त्यांच्या लेखकांची यादी बघा.
गुणोत्कर्ष – वा. वा. खरे १८८५
संगीत छ संभाजी- आ. मो. पाठारे १८९१
सं छ संभाजी- सोनाबाई केरकर १८९६
प्रणयी युवराज- वा. न. शहा
मराठ्यांचा आत्मयज्ञ- नाथ माधव १९१७
राजसंन्यास- रा. ग. गडकरी १९२२
राजसंसार – वि. वा. हडप १९२३
बेबंदशाही- वि. ह. औंधकर १९२४
दुर्दैवी छत्रपती- शं. घो. घैसास १९२५
प्रतिमा कंकन – मा. आ. कामत १९२७
गोमंतक विजय- त्र्यं. वि. वैद्य १९२७
रक्तरण – १९३०
रायगडची राणी – वि. वा. हडप १९३१
शिवाजीला शह – य. ना. टिपणीस १९३३
मराठ्यांचा राजा- मालती तेंडुलकर १९३७
सं छेडलेला छावा- वि. ना. कोठीवाले १९३४
धर्मवीर संभाजी- गं. कृ. बोडस १९४१
सुडाची प्रतिज्ञा – भि. ना. देसाई १९४३
चिडलेला छावा – श्री. कृ. ओक १९४५
थोरातांची कमळा- ना. के. सोनसुखार १९५१
शककर्त्याचा न्याय- मा. आ. कामत १९५२
रणसम्राट – ही. गो. प्रभू १९५२
मानी मराठा – ना. ध. कोचरेकर १९५२
मराठ्यांची स्वामी भक्ती – १९५४
अमर जाहले छ संभाजी- आबासाहेब आचरेकर १९५७
स्वप्न भंगले रायगडाचे – विनोदकुमार शेंडगे १९६२
राजनिष्ठा – बी. एन. सामंत १९६१
रायगडाला जेव्हा जाग येते- वसंत कानेटकर १९६२
छ संभाजी – ल. वि. सांडव १९६४
राजयाचा पुत्र अपराधी देखा – द. ग. गोडसे १९६४
महाराष्ट्राची दौलत – वि. शं. जोशी १९६४
मोहरा इरेला पडला – आ. वि. दळवी १९६५
महाराष्ट्राचा मोहरा- सीमा साखरे १९६६
अश्रू ढळले रायगडाचे- अर्जुन झेंडे १९६७
सती गोदावरी – शं. ब. चव्हाण १९६७
मृत्यू वाकला शंभूपुढे- राजाराम परब १९६७
मराठ्यांचे शंभूमहादेव- वि. शं. जोशी १९६७
इथे ओशाळला मृत्यू- वसंत कानेटकर १९६८
सह्याद्री सांगे कथा शंभूची – आबासाहेब आचरेकर १९६८
स्वराज्याचा नंदादीप – सी. गो. प्रभू १९६९
ही केवळ नाटकांची यादी आहे. कादंबरी, कथा, कविता वेगळ्या. या सर्व साहित्यातून संभाजी महाराज हे व्यसनी, दुराचारी, लंपट, हेकट अशा प्रवृत्तीचे होते असंच रंगवलं गेलं. यातील काहींनी तर आपलं नाटक ऐतिहासिक सत्यावर आधारित आहे असाही कांगावा केला. गंमत म्हणजे, यातील सोनाबाई केरकर ही लेखिका तर केवळ पंधरा वर्षांची अल्लड पोर होती..! या पन्नास नाटकांचे महाराष्ट्रात किती हजार प्रयोग झाले असतील? किती वेळा शंभू चरित्राचा मुडदा पडताना आमचा मराठी माणूस पान विडा चघळत बघत राहिला असेल?
कवी बी नावाच्या कवीनं तर फारच मोठी गोष्ट केली. त्यांनी एक काल्पनिक काव्य लिहिलं..’थोरातांची कमळा!’ या दीर्घ काव्यात त्यांनी असं लिहिलं की, ‘संभाजी महाराजांनी एका थोरात नावाच्या सरदाराच्या कमळा नावाच्या तरुण मुलीला शिवनेरी किल्ल्यावर आणून रखेल म्हणून ठेवले. ज्या ठिकाणी तिला ठेवलं होतं त्याला कमळ बुरुज असं म्हणतात’ अशीही मल्लिनाथी बी यांनी जोडली. मुळात कोणताही मराठा सरदार आपल्या मुलीला कोणत्याही राजाच्या पदरी रखेल म्हणून ठेवणार नाही. शिवाय वरुन शिवनेरी किल्ला कधीच स्वराज्याचा भाग नव्हता. त्यामुळं संभाजी महाराज कधीच शिवनेरीवर गेले नव्हते. शिवाजी महाराज सुद्धा, एकदा त्यांचा जन्म सोडला तर, नंतर कधीच शिवनेरीवर गेले नाहीत. शिवाजी महाराजांनी जुन्नर शहर लुटलं. पण ते वर किल्ल्यावर गेले नाहीत. शिवनेरीवर कमळबुरुज नावाचा कोणताही बुरुज नाही. कदाचित कवी बी याला हा कसलाही इतिहास माहीत नसेल; किंवा त्याला शिवनेरी शिवाय इतर किल्ल्यांची नावेच माहीत नसतील; पण ‘थोरातांची कमळा’ नावाची कविता मात्र काही लोकांनी कमालीची उचलून धरली. पुढं याच काल्पनिक काव्यावर भालजी पेंढारकरांचा ‘थोरातांची कमळा’ नावाचा सिनेमा आधारित आहे. इथून पुढं अशाच सिनेमांची चलती सुरू झाली. कुणाची ‘तुळसा,’ कुणाची ‘गोदावरी,’ कुणाची ‘कमळा’ तर कुणाची ‘मंजुळा..!’ सगळाच बोगस प्रकार. यापेक्षा भालजी पेंढारकरांनी ‘भालजींची बकुळा’ नावाचा खराखुरा चित्रपट काढला असता तर आम्ही त्यांना मानलं असतं. त्याला कारणही तसेच आहे..
रणजित देसाई हे भालजी पेंढारकर यांचे जावयी होते. ते कसे हे आपण पाहू.
रणजित देसाई यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला वेड लागलं (?) म्हणून जन्मभर वेड्यांच्या इस्पितळात ठेवलं होतं. पहिल्या पत्नीपासून त्यांना तीन मुली होत्या. नंतरच्या काळात त्यांनी दुसरं लग्न केलं ते माधवी काटकर यांच्या सोबत. या माधवी काटकर कोण? माधवी या मिस लीला या मराठी अभिनेत्रीच्या कन्या. रणजित देसाई यांच्यासोबत विवाहबद्ध होण्यापूर्वी माधवी यांचंही पहिलं लग्न झालेलं होतं. त्यांना पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी होती. दोघांनी आपापसात लग्न करण्यापूर्वी रणजित यांना कुरुंदकरांनी सल्ला दिला होता की लग्न करु नये, मैत्री ठेवावी. पण माधवी यांना कुरुंदकरांनी दिलेला सल्ला आवडला नाही. त्यांनी रितसर लग्न केलं.
माधवी यांच्या पहिल्या पतीचं आडनाव काटकर होतं. पण लग्नापूर्वीच्या त्या होत्या माधवी पेंढारकर..! प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री मिस लीला ही भालजी पेंढारकर यांची दुसरी पत्नी हे मी वर सांगितलं आहेच. पण भालजी हेही लीलाबाईंचे दुसरे पती होते. लीलाबाईंना भालजी सोबत केलेल्या दुसऱ्या लग्नापूर्वी जी अपत्ये झाली होती त्यापैकी माधवी एक होत्या. म्हणजे माधवी या पेंढारकरांच्या बाॅयोलाॅजिकल डाॅटर नव्हत्या. कानीन अथवा मानसकन्या होत्या. भालजींनी जरी दुसरं लग्न केलेलं असलं तरी भालजी वैयक्तिक आयुष्यात कमालीचे नितीमान पुरुष होते असं सगळेच म्हणतात. त्यांनी बाप म्हणून माधवी यांचे फार लाड केले नसले तरी ( लाड करणं हा भालजींचा स्वभावधर्म नव्हता) पित्याचा धर्म उत्तमरीत्या पार पाडला. ते नेहमीच मानवीय दृष्टिकोनातून वागले. भालजी संघाच्या विचारांनी भारलेले होते. हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र, याबद्दलची त्यांची मते ताठर होती. या मताशी मिळते-जुळतेच चित्रपट त्यांनी काढले. भालजींच्या चित्रपटाचा मोठा प्रभाव तरुण वयातच रणजित देसाई यांच्यावर पडला असणं साहजिक आहे. रणजित यांच्या माधवी सोबतच्या दुसऱ्या विवाहानंतर रणजित हे भालजींचे नात्यानं जावयी झाले. रणजित देसाई उघडपणे हिंदू राष्ट्रवादाचे समर्थन करीत नसले तरी त्यांचं एकूण लेखन त्याच वळणावर जाणारं आहे. रणजित यांच्या पुस्तकातील पानापानांत हा प्रछन्न राष्ट्रवाद दिसून येतो. मग शिवाजी महाराजांनी मस्जिद पाडून मंदिर उभं केलं हा प्रसंग असो किंवा अजून दुसरा कोणता. जागे अभावी मी इथं विस्तार टाळतो आहे.
रणजित यांनी श्रीमान योगी प्रकाशित केली ती १९६८ सालात. त्यावेळी त्यांचं वय केवळ पस्तीस वर्षांचं होतं. पण त्यापूर्वी किमान सहा वर्षे ते या पुस्तकाची जुळवाजुळव करत असावेत. वयाच्या एकोणतीसाव्या वर्षांपासून ‘श्रीमान योगीची’ जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली, असं गृहीत धरायला हरकत नाही. ‘श्रीमान योगी’ पूर्वी १९६२ साली वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी स्वामी लिहीली. स्वामीचा शेवट बाह्यतः कितीही प्लॅटोनिक असला तरी अत्यंत भयकारी आहे. रमाबाईंच्या सती जाण्याचा प्रसंग लेखकानं भलताच खुलवलेला दिसतो. त्या एका प्रसंगामुळं रमा-माधवाची जोडी मराठी मनात (?) घर करून बसली. बायकांनी सती जाण्याचा हा सनातनी फाॅर्म्युला इतका हिट झाला की प्रत्यक्ष रणजित यांनाही सतीप्रथेची भुरळ पडली. स्वामीतील सती जाण्याच्या प्रसंगाची मोहिनी प्रत्यक्ष लेखकावर सुद्धा दीर्घकाळ टिकून राहिली. म्हणून श्रीमान योगीची प्रस्तावना करताना, त्यांनी ‘पुतळाबाई सती गेल्या, त्यांची ही चरित कहाणी आहे,’ अशी जाहिरातवजा भलामण केली. रणजित यांचा हाही फाॅर्म्युला बऱ्यापैकी हिट झाला. त्याच कारणामुळे पुतळाबाई राणीसाहेब सती जाण्याचा उल्लेख असलेला एकमेव दुय्यम पुरावा प्रमाण मानून रणजित यांनी नाहक अनेक अनैतिहासिक गोष्टींचं उदात्तीकरण केलं.
पुतळाबाईंच्या सती जाण्याचं बीजारोपण ‘स्वामी’तील रमाबाईंच्या सती जाण्यात झालेलं होतं हे जाणकारांनी ध्यानात घेतलं पाहिजे.
रणजित यांची ‘श्रीमान योगी’ प्रकाशित झाली ती सन १९६८ सालात. तत्पूर्वी सात वर्षे त्यांनी कादंबरीची जुळवाजुळव केली असं मी म्हटलं आहे. पण ही जुळवाजुळव करताना रणजित यांनी नव्यानं संशोधन करुन तेव्हा उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक साधनांकडे, पुराव्यांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केलं असं म्हणायला जागा आहे. बेंद्रे यांचं संभाजी महाराजांवरील संशोधन सन ६० सालातच प्रकाशित झालं होतं. कमल गोखले यांचा संभाजी वरील प्रबंध मुंबई विद्यापीठात १९६० सालातच सादर झाला होता. रियासतकार सरदेसाई यांनी ‘उग्रप्रकृती संभाजी’ कितीतरी अगोदरच लिहिला होता. तरीही हे उपलब्ध पुरावे डावलून रणजित यांनी घोडचूक का केली? बेंद्रे यांचा संभाजी रणजित यांनी वाचला नाही असं तर म्हणता येत नाही. पण गंमत म्हणजे, पुराव्यांवर भिस्त ठेवून लिहिणाऱ्या बेंद्रे यांनीही काही गंभीर अनैतिहासिक चूका दुरुस्त केल्या नाहीत. त्यांनीही ‘पुतळाबाई सती गेल्या,’ असंच एकेरी विनापुरावा विधान केलं आहे. अजून एक म्हणजे, बेंद्रे यांनी संभाजी राजांना चंपाबाई नावाची एक भार्या होती हे पण लिहिलंय. चंपा बाई ही शंभूराजे भोसले नाही तर शंभूराजे देसाई या दुसऱ्याच व्यक्तीची पत्नी होती हे बेंद्रे यांना कळलं नाही. पुतळाबाई, सकवारबाई, सोयराबाई यांच्या माहेरच्या घराण्यांबद्दल बेंद्रे यांनी अशाच गफलती करून ठेवल्या आहेत. कोणती राणी कोणत्या घराण्यातील आहे हे बेंद्रे यांना नक्की ठाऊक नसावं. जिथं बेंद्रे सारख्या चिवट इतिहासकारांची ही कथा आहे, तिथं सवंग लेखन करणाऱ्या रणजित यांना दोष तरी किती द्यायचा?
– #संजय कामनगावकर – मो.7588523520