कुंडलवाडी- स्वतःचे आयुष्य घडवितांना ज्यांनी ज्यांनी मदत केली अशा अकरा जणांचा स्वतःच्या सेवानिवृती सोहळ्यात सत्कार करून प्रा.शंकर पवार यांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन आमदार सतीश चव्हाण यांनी केले.
कुंडलवाडी येथील कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार ज्युनियर कॉलेजचे प्रा.शंकर पवार यांच्या सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन संस्थेने केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्षा श्रीमती कुसूम सब्बनवार तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड,माजी प्राचार्य राम जाधव,व प्रा.कल्पना जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सतीश चव्हाण म्हणाले की, प्रा.शंकर पवार हे श्रमप्रतिष्ठा,कर्तव्यनिष्ठा,समाजनिष्ठा,कुटुंब वत्सलता ,व कृतज्ञ भाव जपणारं एक आगळंवेगळं व्यक्तीमत्व आहे. त्यांनी त्यांच्या सेवापुर्ती सोहळ्यात त्यांना ज्यांनी ज्यांनी घडवलं,आधार दिला असे गब्बू देवला राठोड आष्टूरकर,विठ्ठल रायकंठवार, सुभाष पवार, राम पवार, प्राचार्य राम जाधव ,श्रीमती कुसुम सब्बनवार,सुनिल काळे, सरस्वतीबाई कवठाळे, काशिराम ईंगळे,शेषराव पाटील कदम व अशोक दगडे याअकरा आधारवडांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
पवारांनी केवळ स्वहित न पाहता आपल्या जीवनात इतरांना मोठं करण्याचं काम केलं, अनेक विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करुन शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी विधायक.व सकारात्मक लेखनाला प्राधान्य दिलं,बातें कम ,काम ज्यादा ही वृत्ती बाळगली, संस्थेप्रती कृतज्ञता म्हणून शाळेच्या वर्धापन दिनी “मरणोत्तर देहदानाचा ” त्यांनी केलेला संकल्प शिक्षण व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आदर्शवत असल्याचे गोरवोद्गार शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी काढले. यावेळी प्राचार्य राम जाधव ,प्रा.कल्पना जाधव,कुणबी मराठा समाजाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव,जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड,व संस्था सचिव डॉ. प्रशांत सब्बनवार यांची शंकर पवार यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली.
यावेळी प्रा.शंकर पवार यांचा शाल,श्रीफळ, सन्मान पत्र देऊन सपत्नीक सत्कार संस्था,व शाळेच्यावतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,कुंडलवाडी शहर व परिसरातील नागरिक, शाळांचे प्रतिनिधी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविकांत शिंदे यांनी तर उपस्थितांचे आभार सुरेखा वगशेट्टे यांनी मानले.