नांदेड- बिन टाक्याची कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया असतानाही टाके घालणे एका डॉक्टराला चांगलेच भोवले. २२ महिलांपैकी एका महिलेला टाकेच घालायले विसरल्याने मोठा गोंधळ उडाला. यानिमित्ताने येथील भोंगळ कारभारही उघडकीस आला आहे.
लोहगाव ता. बिलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमितपणे कुटुंबकल्याण शस्रक्रीया शिबीराचे आयोजन करण्यात येते. काल मंगळवारी असेच शिबीर होते. यात २२ महिला होत्या. ही शस्त्रक्रीया बिन टाक्याची असतानाही डॉ. बेलखोडे या स्पेशालीस्ट डॉक्टरांनी छोट्या जखमेला टाके घालायला सुरुवात केली. पण पेशंटची संख्या, सोबतीला एकच निवासी महिला डॉक्टर आणि कसली तरी घाई यात एका महिलेला टाके घालायचेच डॉक्टर विसरले. ही महिला बोरगाव येथील रहिवासी आहे. टाके घातले नाहीत ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना धारेवर धरले. यावेळी उपस्थित महिला आरएमओ घाबरून गेल्या. विशेष म्हणजे एवढा मोठा कँम्प असूनही दुसरे निवासी डॉ. जाधव गैरहजर होते. शेवटी हे प्रकरण शांत झाले असून तालुका वैद्यकीय अधिकारी वाडेकर यांनी संबंधितांवर कारवाई करू असे सांगितले.
दरम्यान, सदरील रुग्णालयाची कोट्यवधी खर्चून मोठी इमारत बांधण्यात आली पण, हा दवाखाना गैरसोईचे माहेरघर झाला आहे. सेवक पदाच्या ५ जागा मंजूर असूनही या ठिकाणी एक महिला सेविका कार्यरत आहे. पिण्याचे शुद्ध पाणी नाही, फर्निचर तुटलेले, गाद्या फाटलेल्या आहेत. डॉक्टर गैरहजर असतात, असतील तर उद्धटपणाची वागणूक देतात. त्यामुळे सामान्य रुग्णांची हेळसांड होते. रुग्णांना खाजगी दवाखान्याची वाट दाखवली जाते.
याठिकाणी ताबडतोब सेवक भरती व निवासी डॉक्टरांची संख्या वाढवून त्यांना मुख्यालयी रहाने बंधनकारक करावे अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांना यासंदर्भात भेटून निवेदन देण्यात येणार आहे.
-डॉ. दिलीप शिंदे